Wednesday, 21 April 2010

किसारागुट्टा सहल - थकलेल्या जीवाला विश्राम

किसारागुट्टा सहल - थकलेल्या जीवाला विश्राम

गेल्या दोन वर्षांपासुन ऑफिस, रुम, आणि घरी (गावी) दोन दिवसाची सुटी सोडुन वेगळं काही केलंच नाही.  मित्रांना हजारवेळा सांगुन सुद्धा एकाही सहलीचा प्लॅन बनला नाही. गोवा, कन्याकुमारी, जयपुर पासुन गेल्यागावी श्रीशैलमला तरी जाउया म्हणुन मित्रांना म्हटले, पण त्यांच्या व्यापांमुळे कधीच प्लॅनचे प्रत्यक्षात अवतरण झाले नाही.  

माझ्या बाजुला राहणारी तेलुगु बॅचलर पार्टी मात्र विकांत मजेत साजरी करत असते.  असेच एकदा त्यांच्यासोबत बोलताना त्यांनी विशाखापट्टणमला केलेल्या सहलीचे फोटो दाखविले आणि सोबत काय काय धमाल केली ते पण सांगितले, मग काय मी लगेच त्यांना त्यांच्या पुढील प्लॅनिंग बद्दल विचारले. त्यांच्या प्लॅनिंग डायनॅमिक असतात केवळ दोन-तीन दिवस आधी माहिती होते.  मी म्हटलं मग जेंव्हा केंव्हा निघणार असाल मला गृहीत धरा. 

३-४ दिवसांपुर्वी रेड्डीचा फोन आला, या रवीवारी तयार रहा, किसारागुट्टाला जायचे आहे म्हणाला.  किसारागुट्टा माझ्यासाठी नविन प्रकरण होते, नेमके तिथे काय आहे, आणि या उन्हाळ्यात काय मजा येणार असे वाटुन गेले, पण घरात बसुन ४०-४२ डिग्रीमध्ये वेगळे काय साधनार होतो, म्हणुन मग निघालो. 

किसारागुट्टा हे हैदराबादपासुन २०-२५ कि.मी.वर असणारे एक स्थळ आहे, इथे टेकडीवर महादेवाचे मंदीर आहे.  टेकडीखाली काही शेती आहे.  सकाळी सातला तयार होऊन मित्राकडे पोचलो, तिथुन एका नियोजीत ठीकाणाहुन मोटारसायकली घेतल्या आणि तब्बल नऊ मोटारसायकलींवर अठराजणांचा जत्था किसारा कडे निघाला.  त्यातले पाच कपल्स आणि बाकी आठ बॅचलर्स होते.  प्रत्येकाजवळ ३-४ किलो वजनाची एक पिशवी, ज्यात पाण्याच्या बाटल्यांपासुन, मसाले, खाणसामान आणि इतर अनेक गोष्टी होत्या.

टेकडीखाली पठ्ठ्यांनी आधीच एक शेत हेरुन ठेवलं होतं.  मस्तपैकी भाताची शेती, जवळच पाण्याची मोटार, आणि प्रशस्त असा एक वृक्ष, या वृक्षाखालीच आमचे बस्तान बसले.  थोडीफार साफसफाई वगैरे करुन त्यावर चटई अंथरली, मस्त पैकी बैठक जमली, तेलुगु हास्यकल्लोळात मीही अर्धेअधीक समजत नसताना पार मिसळुन गेलो होतो, नाही म्हणायला एक मित्र जोकचे हिंदी रुपांतरण अधनं मधनं सांगत होताच.  सर्वप्रथम गप्पाष्टकांसोबत पुरी, भाजी आणि टोमॅटो चटणी न्याहारी साठी हाणली, तेलुगु लोकांनाही पुरी जमते बरं :-), घरघुती असल्यामुळे ती अप्रतिम होतीच.

खाणं उरकल्यावर थोडी शेतात भटकंती झाली, उन्हाळ्यामुळे इतर काही नव्हतं पण भाताची शेती जोरात होती, आणि भरपुर पाण्यामुळे हवाही थंडगार होती, फिरायला मजा आली.  त्यानंतर दुपारच्या मेन जेवणाची तयारी सुरु झाली,  तिथेच झाडाखाली एक मोठी आणि एक छोटी अशी साध्या दगडांची चूल तयार करण्यात आली.  वेगळ्या वेगळ्या पोतडीतुन मग भांडी, चमचे, मसाले, आणि जेवण बनविण्याचे हरेक सामान निघायला सुरुवात झाली.  मेन्यू मोठा होता मटण, फिश फ्राय मांसाहारींसाठी तर शाकाहारींसाठी पनीर मसाला, साधा भात आणि बगारा राईस (थोडक्यात मसाला भात).
विशेष म्हणजे मांसाहारी पदार्थ बनविनारा आमचा शिवा हा मित्र संपुर्ण शाकाहारी आहे, पण जेवणाला काय चव.. एकदम भन्नाट.

आम्ही (ज्यांना खाणं फक्त खाता येते) लोकांनी बाकी तयारी होईस्तोवर सरपणाची व्यवस्था केली, आणि तिकडे खाणं बनविने सुरु असताना काही जण पत्ते कुटत बसले. चुलीवर भांडी काळी होऊ नयेत म्हणुन त्याला शेतातली ओली माती बाहेरुन लावण्यात आली, किती सोपी आयडीया आहे ही.  मी त्यांचं कौतुक केलं तर ते हसु लागले, म्हणाले अरे ही काही आम्ही शोधलेली पद्धत नाही, खेडेगावी असेच वापरतात.  मग माझ्या (मठ्ठ?) डोक्यात नवी माहिती जमा झाली.  मग काय तास दोन तास केवळ सुवास भरुन राहीला होता, अप्रतिम असं जेवण तयार होतं.  मग काय काहीही वेळ न घालवता आम्ही त्या सुंदर जेवणावर यथेच्छ ताव मारला.  जेवता जेवता हास्यकल्लोळ चालु होता, पण तेलुगुतुन असल्यामुळे मला फार थोडा कळत होता.  पण जेवण अतिशय रुचकर असल्यामुळे मी जास्त लक्ष खाण्याकडे दिले. 

जेवणं झाल्यावर आवराआवरी सुरु झाली, तोपर्यंत ४ वाजले होते, अजुन गप्पाष्टकं चालली.  ५ च्या सुमारास उन्हाचा पारा थोडा कमी झाला, आणि मग थोडे खेळ खेळण्याचं ठरलं.  सर्वांकडे एक एक फुगा देउन त्याला फुगवायला सांगितलं, सर्वांचे फुगे फुगवुन झाल्यावर असं सांगितलं गेलं की आता एकमेकांचे फुगे फोडायचे आणि आपला फुगा फुटू नाही द्यायचा, ज्याचा फुगा शेवटपर्यंत राहील किंवा सर्वात शेवटी फुटेल तो जिंकला, त्याला रु. १००/- असे घसघशीत बक्षीस देण्यात येईल ;-).  मग काय प्रचंड धुळीचा लोट उडवत, आम्ही ज्याचे दिसतील त्यांचे फुगे फोडायच्या मार्गावर लागलो.
मी अपेक्षेप्रमाणेच लवकर हरलो, आणि दुसर्‍यांच्या फुग्यांच्या मागे लागलो, पण या खेळात मस्त मजा आली, कपडे मात्र धुळीने पुर्ण माखुन गेले होते. त्यानंतर हौजी खेळलो,  टिकीटांच्या पैस्यातुन बक्षीसं ठरली, परत तिथे सुद्धा जिंकता जिंकता हरलो, पण मजा मात्र खुप आली.  लहान मुलांसारख खेळताना खरंच खुप मजा आली आणि या प्रचंड धावपळीच्या आयुष्यात किती छोट्या छोट्या गोष्टी महान आनंद देऊन जातात ते कळालं.. खरंच खुप अप्रतिम वेळ गेला.

सातच्या आसपास तिथुन निघालो आणि मित्राच्या घरी आलो, मग परत तिथे साधा भात आणि अप्रतिम साधं वरण आणि तूप हाणलं, नंतर टरबुज आणि अमुलचे सुंदर बटर स्कॉच आईसक्रिम हादडले.  रात्री दहाच्या आसपास पेंगुळलेल्या अवस्थेत घरी पोचलो, आणि दिवसभराच्या थकव्याने पण उल्हासित, तजेलदार मनाने पलंगावर झोपी गेलो.

Saturday, 10 April 2010

अनाम कलाकार

लोकल ट्रेन मधील अनाम कलाकाराची कलाकारी