अनिल अवचटांचं 'अमेरिका' पुस्तक वाचलं. अमेरिकेबद्दल असणारी उत्सुकता म्हणा, हेरंबने पुस्तक चांगलं आहे याची दिलेली खात्री म्हणा, अतिशय उत्कंठेने वाचायला घेतलं.
इंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रामसाठी म्हणुन गेलेल्या अवचटांनी अमेरिकेतल्या गोष्टींच छान अवलोकन केलं आहे. पुस्तकाची सुरुवात अर्थातच साध्या निरिक्षणांनी होते, जसे स्वच्छता, सोयी, टुरीस्ट गाईड, त्यांची कृत्रीम हसण्याची पद्धत, गाड्या, चकचकीत रस्ते. मग हळूहळू इतर काही विशेष अमेरिकन गोष्टी जसं नायग्रा धबधबा, शॉपींग सेंटर्स, वकील व्यवसाय, टी.व्ही., व्यसन (ड्रग्स, दारू इ.) कुटुंब संस्था, काही युनिवर्सीटी, शहरं याचं वर्णन आहे.
तिथं त्यांना भेटलेली चांगली माणसं, लास व्हेगास, कसिनो असं चकचकीत अमेरिकेचं माहित असलेलं रूप दाखवता दाखवता शेवटाला मेक्सिको ह्या अमेरिकेलगतच्या देशाचं विदारक वर्णन, रेड इंडियन्स आणि त्यांचा इतिहास, गोरा काळा भेद, असं काहीसं माहित नसलेलं रुपडंही दाखवतात. हे पुस्तक १९९० च्या आसपास लिहिलं आहे, एकंदर परिस्थिती आताही तशीच आहे आणि (अंध)अनुकरण करणार्या भारतासारख्या इतर काही देशांची वाटचाल त्याचदिशेनं सुरू आहे असं दिसतं.
भारतीयांची संख्या तिथं आता भरपुर आहे, मग त्या भारतीयांची मानसिकता, द्विधा मनःस्थिती अतिशय योग्य रित्या मांडली आहे. शेवटी भारत आणि अमेरिकन संस्कृतीचा एक आढावा आहे, त्यात ही संस्कृती खराब ती चांगली असं काहीही न करता, दोन्हींचे चांगल्या आणि वाईट बाजू दिल्या आहेत. वाचण्याजोगं आहे हे पुस्तक.
"अमेरिका"
लेखकः अनिल अवचट
मॅजेस्टीक प्रकाशन