Monday, 8 March 2010

छंद 1

माझ्या लहानपणाचे छंद वेगळेच होते, मला इतरांना सांगायची लाज वाटायची.
चित्रकलेची आवड होती, पण चित्रपटांच्या आकर्षणामुळे मला नुसती चित्र काढण्यापेक्षा सिनेमाची पोस्टर काढायचा छंद जडला.
दुरदर्शनवर चित्रहार मध्ये गाणे चालु होण्यापुर्वी केवळ काही सेकंदासाठी त्या सिनेमाचे पोस्टर दाखवायचे, ते पाहुन गाणे संपण्यापुर्वी मी जवळपास हुबेहुबपणे चित्रपटाचे नाव पाटीवर काढायचो.
नाव म्हणजे नुसते नाव नाही, त्याच्या योग्य फॉन्ट सहीत. यासाठी मला दगडी पाटी फार आवडायची, प्लॅस्टीकची पाटी कधी नाही आवडली.
मग काही दिवसांत मी पेन्सिल वापरुन अजुन ठीकठाक पोस्टर्स काढु लागलो. मग काय, एखाद्या चित्रपट थिएटर मध्ये जसे पोस्टर्स चिकटवले जातात त्याप्रमाणे घराच्या भिंतीवर चिकटवणे सुरु झाले.
मग त्यासाठी ओरडा खाल्ल्यावर मात्र हे उद्योग बंद झाले. त्यानंतर सर्व पोस्टर्स एका पत्र्याच्या पेटीत ठेवायला सुरुवात केली. उन्हाळयाच्या सुट्टीत मामाकडे गेलो असताना इकडे ती पेटी कुठे अंतर्धान पावली ते आजपर्यंत कळाले नाही... त्यानंतर कुठेतरी स्क्रीन पेपर बघायला मिळाला आणि पानंभर चित्रपटाचे मोठे पोस्टर पाहुन डोळे दिपुन गेले. त्यानंतर प्रत्येक शनीवारी सायकल घेवुन रेल्वे स्टेशन जवळील स्टॉलवरुन स्क्रीन पेपर आणण्याची सवय लागली. त्यातही चांगले पोस्टर्स मी परत एका ब्रिफकेस मध्ये जमा केले होते, कालांतराने अभ्यासाच्या गर्दीत ते सर्व नाहीसे झाले, आणि माझा हा छंद सुटला. आता त्यातले मी स्वत: काढलेले काही अप्रतीम(मला वाटलेले ;-) ) आलेले पोस्टर्स सुद्धा नाहीत याची खंत वाटते.

13 comments:

 1. अरे वा. . . .आता परत सुरूवात करा की पोस्टर काढायला!!!

  ReplyDelete
 2. मनमौजी, हा हा हा... आता सवय नाही राहिली.
  पण लहानपणी एके वेळी मी त्याचा प्रोफेशन म्हणुन सुद्दा विचार पक्का केला होता :)

  आवर्जुन प्रतिक्रियेकरिता धन्यवाद!

  ReplyDelete
 3. वाह वाह... आनंदराव... नविन एखाद्या चित्रपटाच पोस्टर काढाच... माझ्यासाठी नटरंगचं पोस्टर काढा आणि द्या पाठवून...

  ReplyDelete
 4. हा..हा..सौरभ, पहातो प्रयत्न करुन, पण बरेच दिवस झाले, सवय नाही आता. :)

  ReplyDelete
 5. परत एकदा खतपाणी द्या कि हो राव जुन्या छंदाला...तुम्ही काढलेली पोस्टर्स बघायला नक्की आवडेल...

  ReplyDelete
 6. आभार देवेन्द्र, खात्री नाही देउ शकत पण प्रयत्न करतो. :)

  ReplyDelete
 7. छान सवय होती. अजूनही असेल तर सुरुवात करायला हरकत नाही. म्हणजे आवड म्हणून. मी आजच एक फुटबॉल आणला आहे. आणि माझ्या लहान भाऊ बहिणी बरोबर खेळणार आहे. इच्छा मनात ठेवायची नाही. मी माझ्या सगळ्या इच्छा मी स्वतः पूर्ण करायचा प्रयत्न करतो.

  ReplyDelete
 8. ब्लॉगवर स्वागत हेमंत, सवय नाहीये आता.
  सध्या ब्लॉगिगचा छंद आहे ना :)

  ReplyDelete
 9. आनंद कॉलेजच्या वेळी मैत्रीणीकडून दादर स्टेशनला जायचा एक आतला रस्ता होता. तिथे एक काका नेहमी असे मोठे पोस्टर्स रंगवताना दिसायचे..अर्थात त्यांचा तो व्यवसाय होता...ही पोस्ट वाचल्यावर तो रस्ता आणि त्यांचे ते अर्धवट रंवगलेले नट-नट्यांचे चेहरे अगदी डोळ्यापुढे आले...

  ReplyDelete
 10. धन्यवाद अपर्णाजी, ब्लॉगवर स्वागत...मला तर असे पोस्टर रंगविणारे दिसले तर मी उभे राहुन बघतच रहायचो.

  ReplyDelete
 11. वा.. एकदम वेगळा छंद आहे रे हा खरंच.. पुन्हा सुरु कर ना.

  ReplyDelete
 12. धन्यवाद हेरंब, विचार आहे रे, थोड स्वस्थ असल्यावर पुन्हा जरुर सुरु करीन

  ReplyDelete
 13. आनंद, केलास का प्रयत्न? आता एक गोड कारणही आहे. :) होऊन जाऊ दे की... !

  ReplyDelete